Home मुख्यमंत्रियों की खबरें/राज्यों की खबरें मध्यप्रदेश, महाराष्ट्राच्या दरम्यान पाण्याचे पुनर्वाटप करण्याची मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे विनंती।

मध्यप्रदेश, महाराष्ट्राच्या दरम्यान पाण्याचे पुनर्वाटप करण्याची मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे विनंती।

322
0

नविदिल्ली, मध्यप्रदेशातील चौराई धरणामुळे पेंच प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात पाणी टंचाई निर्माण झाली आहे, त्यामुळे पाण्याचा येवा कमी झाला आहे. यासाठी महाराष्ट्र व मध्यप्रदेशाच्या पाणी आरक्षणाचे पुनर्वाटप करावे, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी, महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन उपस्थित होते। मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले की, महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशमध्ये पाणी वाटपासंदर्भात 1968 मध्ये एक करार झाला होता. या करारानुसार मध्यप्रदेशाचा वाटा 35 अब्ज घनफूट आणि महाराष्ट्राचा वाटा 30 अब्ज घनफूट निश्चित करण्यात आला होता. मात्र, मध्यप्रदेश हद्दीतील पेंच चौराई प्रकल्पाचे घळभरण जून 2016 मध्ये पूर्ण झाले असून या प्रकल्पात 607.00 दलघमी पाणी अडविण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील तोतलाडोह प्रकल्पात पाण्याचा येवा कमी झाला आहे. त्यामुळे नागपूर शहरासह नागपूर जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण झालेली आहे। गोदावरी खोऱ्याच्या वैनगंगा उपखोऱ्यातील पेंच नदीवर पेंच प्रकल्प रामटेक तालुक्यात बांधलेला आहे. या प्रकल्प समूहात पेंच जलविद्युत (तोतलाडोह) मुख्य धरण, पेंच पाटबंधारे प्रकल्प- नवेगाव खैरी (उन्नैयी बंधारा), रामटेक जवळील खिंडसी जलाशय या 3 जलाशयांचा समावेश आहे. या जलाशयातूनच नागपूर शहर तसेच जिल्ह्याला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. परंतु चौराई धरणामुळे यावर्षी हे तीन जलाशय भरु शकले नाहीत. त्यामुळे या भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवला आहे. यावर उपाय म्हणून महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश यामध्ये पुनर्वाटप करण्याची सूचना मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी केली असून मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री श्री. चौहान यांनी तत्वत: मान्यता दिली असून यासंदर्भातील बैठक लवकरच होणार असल्याचे ठरले। नागपूर जिल्ह्यात पाणी आणण्याकरिता जामघाट योजना मंजूर होती, परंतु मध्यप्रदेशमध्ये पुनर्वसन व जंगल जमिनीमुळे हा प्रकल्प रखडला होता. यासाठी महाराष्ट्र 60 किलोमीटरपर्यंत टनेलद्वारे पाणी आणू शकतो. हा पर्याय बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुचविला. त्यास या बैठकीत तत्वत: मान्यता देण्यात आली. याबाबत लवकरच सचिव स्तरावर बैठक होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले। कन्हान नदी ही गोदावरी खोऱ्यातील प्राणहिता उपखोऱ्यातील (जी-9 ) वैनगंगा नदीची उपनदी आहे. या नदीचे उगमस्थान मध्यप्रदेशातील महादेव डोंगरातून झाले असून ही नदी मध्यप्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यातील सौंसर तालुक्यातून महाराष्ट्रात प्रवेश करते. गोदावरी पाणी तंटा लवादाने ठरविल्याप्रमाणे कन्हान नदीच्या पाण्याचा वापर मध्यप्रदेश व महाराष्ट्र राज्यांनी करावयाचा आहे. याबाबत 7 ऑगस्ट 1978 रोजी दोन्ही राज्यांदरम्यान एक करार करण्यात आला. या कराराप्रमाणे कन्हान नदीवर मध्यप्रदेश क्षेत्रात साठा निर्माण करून 15 अब्ज घन फूट पाणी 15 ऑक्टोंबर ते 30 जून या काळात महाराष्ट्र राज्यास मिळवावयाचे आहे. 15 अब्ज घनफूट पाणी नियंत्रित प्रवाह महाराष्ट्र राज्यास देण्याच्या दृष्टीने मध्यप्रदेश क्षेत्रात जे साठे निर्माण करावयाचे आहेत त्यांचा संपूर्ण खर्च तसेच भूसंपादन व पुनर्वसनाचा खर्च महाराष्ट्र राज्याने करावयाचा आहे. या तरतूदीच्या पार्श्वभूमीवर आंतरराज्य नियंत्रण मंडळाच्या बैठकीत जामघाट जलविद्युत प्रकल्प विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। आज झालेल्या बैठकीत जामघाट योजनेसंदर्भातील उपाय म्हणून 60 किलोमीटरपर्यंत टनेलव्दारे पाणी महाराष्ट्रात आणण्याच्या दृष्टीने चर्चा झाली असून बैठकीत या विषयावर तत्वत: मान्यता देण्यात आली।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here